राज्यातील कोविड रुग्ण संख्या एकदम कमी झालेली नाही. अधूनमधून ही रुग्ण संख्या वाढतेय. मात्र राज्यभरातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आता कोविडग्रस्त व्यक्तींची संख्या प्रत्येकी तिसहून कमी झाली आहे. काही आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी तर प्रत्येकी पंधराहूनही कमी रुग्ण आहेत. हे बदलते चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक शहरी भागात असलेल्या रुग्णालयांच्या क्षेत्रात कोविड रुग्ण संख्या अजून जास्त खाली उतरलेली नाही. काही शहरांमध्ये रोज पाच ते दहा नवे कोविड रुग्ण आढळत आहेत. मात्र काही शहरांमध्ये पूर्वीपेक्षा आता कमी कोविड रुग्ण दिसून येत आहेत. पंचवीस दिवसांपूर्वी वास्को नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ९५ कोविड रुग्ण होते.